नळदुर्ग शहरातील दिशा नागरी पतसंस्थेत आज्ञात चोरट्यांचा सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम असे कोट्यावधी ऐवजावर डल्ला
नळदुर्ग,दि.०९ :
शहरात जाणा-या मुख्य रस्त्यावर, भर बाजारपेठेत असलेल्या एका पतसंस्थेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे मिळुन कोट्यावधी रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शनिवार दि.८ नोव्हेंबर रोजी पहाटेपुर्वी घडली आहे.दरम्यान या घटनेमुळे बँक ग्राहाकात एकच खळबळ उडाली आहे.
नळदुर्ग शहरातील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतील लॉकरमधील कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चोरून नेले. ही घटना सिसीटिव्हीत कैद झाली असुन ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी रोखपालास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नळदुर्ग येथील दिशा पतसंस्थेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारचे दैनंदिन कामकाज करून घरी गेले. मध्यरात्री एका अज्ञात तरुणाने तोंडाला कपडा बांधून अर्धनग्न अवस्थेत बँकेचे शटर उचकटून आत प्रवेश केला व चार चाव्या असलेला लॉकर सहज हाताने उचकटून तिजोरीतील सोन्याचे अलंकार व रोकड बॅगमध्ये भरून पसार झाला. दरम्यान सकाळी स्वच्छता करणाऱ्या महिलेला दिशा नागरी सहकारी पतसंस्था बँकेचे शटर उचकटल्याचे दिसून आले, त्यानंतर पोलिसांना दुपारी माहिती मिळाली. तातडीने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उमाजी गायकवाड त्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाच ते सहा कोटी रुपयांची चोरी झाल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना कल्पना दिली. त्यानुसार धाराशिव श्वानपथकास पाचारण करण्यात आले, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक, पोलिस अधिक्षक रितू खोखर, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंके, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, पोलिस उपनिरीक्षक संतोष गिते आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी बँकेचे कर्मचाऱ्यांस ताब्यात घेऊन चौकशी करीत आहेत.