जळकोट ग्रामपंचायतीच्या लक्षावधी कामाच्या गैरकारभारा प्रकारणी दोषींवर कारवाईसाठी उपसरपंचाची ग्रामविकास मंत्र्याकडे धाव


नळदुर्ग, दि.०६ डिसेंबर 


तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधीमधील लक्षावधी रुपयांच्या गौरप्रकाराची चौकशी करून दोषींवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामविकास मंत्र्यासह धाराशिव जिल्हा प्रशासनाकडे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,जळकोट ता.तुळजापूर  ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून  दरवर्षी वित्त आयोगाच्या माध्यमातून ५० ते ७० लाख रुपये विकास कामांसाठी मिळतात. तसेच ग्रामनिधीच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळते.
सन २०२४-२५ दरम्यान, ग्रामपंचायतीतून वित्त आयोग निधीमधील विविध कामांची बिलं काढण्यात आली आहेत. मात्र, अनेक बाबींमध्ये संशयास्पद व्यवहार असल्याचे उपसरपंचांनी नमूद केले आहे.
डस्टबिन खरेदीः ८ लाख रुपये साई एन्टरप्रायजेसच्या नावाने बिल काढले. परंतु डस्टबिन अद्याप उपलब्ध नाहीत. फॉगींग मशीन ग्रामपंचायतीकडे यापूर्वी यंत्र नव्हते; तरी २.४५ लाखांचे बिल काढले. महिला प्रशिक्षणः २ लाख रुपये., सिमेंट रस्ते कामेः २५ लाख रुपये., बंदिस्त गटारीः १५ लाख रुपये., शौचालय खरेदीः २ लाख रुपये., पाणीपुरवठा कामेः २६ लाख रुपये असा भष्ट्राचार झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.


उपसरपंच प्रशांत नवगिरे यांनी ही माहिती ग्रामपंचायत अधिकारी आणि त्रयस्त कारभारकांकडे विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि डस्टबिन खरेदीसाठी धावपळ सुरू असल्याचे सांगितले गेले. निवेदनात म्हटले आहे की, वित्त आयोग आणि ग्रामनिधीचा खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत बैठकीत चर्चा करून मान्यता घेणे आवश्यक आहे; परंतु याबाबत कोणतीही बैठक न झाल्याचे दिसून येते.


त्यामुळे, प्रत्यक्ष कामे मोजमापानुसार व मापदंडानुसार केली आहे का ?, याचीही चौकशी करून उपसरपंच नवगिरे यांनी या गैरप्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करून दोषींवर  फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती ग्राम विकास मंत्री, धाराशिव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिक्षक , तुळजापूर पं स.गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी देवानंद रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होवु शकला नाही.

 
Top