नळदुर्गमध्ये भाजपाकडून या निष्ठावंतांना मिळणार स्विकृतची संधी?


नळदुर्ग,दि.२९: 


नळदुर्ग नगरपालिका निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर आता वेध लागले आहेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याचे. इतिहासात पहिल्यांदाच भाजपने निर्भेळ यश संपादन केले आहे. 


भाजपच्या यशामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन, भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले संघटित काम हे मुख्य कारण आहे. पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यामुळे उपनगराध्यक्ष पदालाही महत्त्व प्राप्त होणार आहे.

 आतापर्यंत अपराजित राहिलेले व आमदार पाटील यांचे निष्ठावंत नय्यरपाशा जागीरदार व अनुभवी दत्तात्रय दासकर हे उपनगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र ऐन वेळेस दुसरा एखादा नगरसेवक उपनगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरू शकतो. धार्मिक समतोल राखण्याच्या दृष्टीने जागीरदार यांचे पारडे जड वाटते.

स्वीकृत नगरसेवकसाठी विचार करता दोन्ही पक्षांनी अनेकांना आश्वासन दिले आहे. भाजपाकडून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे जुने कार्यकर्त्यांचा समावेशच नसल्याचे स्पष्ट जाणवते. भाजपाकडून निवडून आलेल्यांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेले चारजन, काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले तीघासह नगराध्यक्ष तर सेनेतून आलेले एक व इतर दोन जन विजयी झाले आहेत. म्हणजेच जुन्या किंवा मुळ भाजपातील एकही नगरसेवक नाही. त्यामुळे मूळ भाजपात नाराजी व खदखद असल्याचे आढळून येते. त्यामुळे भाजपातील जुने कार्यकर्ते धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, अजय देशपांडे यांचा स्वीकृतसाठी विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच साठेनगर येथील पदाधिकारी धनाजी गायकवाड व मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानेश्वर घोडके यांचीही स्वीकृतसाठी वर्णी लागू शकते. 


काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकाबाबत विचार करता अशोक जगदाळे यांच्यासमवेत काँग्रेसवासी झालेल्या एकाही उमेदवाराचा विजय होऊ शकला नाही. त्यामुळे जगदाळे कोणत्या विश्वासू पदाधिकाऱ्यास संधी देतात हे पहावे लागेल.

 
Top