आठवडा होत आला , मतदानानंतरही निवडणुक निकालाबाबत सर्वाधिक चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
नळदुर्ग, दि.०८ :
नळदुर्ग नगरपालिका सार्वञीक निवडणुकीसाठी मंगळवार दि.२ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व २० नगरसेवकपदाच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहिर होणे अपेक्षित होते.मात्र इतर काही नगरपालिकांची निवडणुक २० डिसेंबर रोजी असल्याने २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही टप्प्यातील निवडणुकाची मतमोजणी एकत्रित दि. २१ डिसेंबरला करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शहरात सर्वत्र चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. या बूथवर अमुक उमेदवाराला इतके मतदान पडतील, तर कोण पिछाडीवर? कोण आघाडी घेणार असा अंदाज बांधत चर्चा करताना दिसुन येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चहाच्या हॉटेल, पान टपऱ्या,गल्ली बोळात एकच चर्चा सुरु आहे, की नगरपालिकेचा नवीन कारभारी कोण? होणार.
प्रभाग क्रमांक १ वसंतनगर, दुर्गानगर मधील १ हजार ६६८ मतदारांपैकी १ हजार ३५३ मतदान झाले.
प्र.क्र. २ इंदिरानगर, व्यासनगर मधील २ हजार ११ मतदारांपैकी १हजार ३५२ मतदान झाले.
प्र.क्र. ३ माऊलीनगर, व्यासनगर, शनिवार वाडा मधील १ हजार २९२ मतदारांपैकी ९५०,
प्र.क्र. ४ ब्राह्मण गल्ली, गवळी गल्ली, महम्मद पन्हा मोहल्ला मधील १ हजार ५९६ मतदारांपैकी ९६४ एवढे मतदान झाले.
प्र.क्र. ५ मराठा गल्ली, बोरी घाट, काझी गल्ली, महंम्मद पन्हा मोहल्ला मधील १ हजार ७९१ मतदारांपैकी १ हजार ३१९ मतदान झाले.
प्र.क्र.६ मुलतान गल्ली, भोई गल्ली, साठेनगर मधील १ हजार ९७४ मतदारांपैकी १ हजार ४७५ मतदान झाले.
प्र.क्र. ७ कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली,हत्ती गल्ली मधील १ हजार ८५५ मतदारांपैकी १ हजार ३७८ मतदान झाले.
प्र.क्र.८ चांभार गल्ली, हत्ती गल्ली,भिमनगर मधील १ हजार ५०८ मतदारांपैकी १ हजार ८६ मतदान झाले.
प्र. क्र ९ भवानीनगर रहीमनगर, प्राध्यापक कॉलनी, व्यंकटेशनगर मधील १ हजार ७१२ मतदारापैकी १हजार २८६ मतदान झाले.
प्र. क्र १० भिमनगर, बौद्धनगर, रणे प्लॉटिंग मधील १ हजार ९१३ मतदारापैकी १ हजार ३६६ इतके मतदान झाले. नळदुर्ग शहरातील एकुण १७ हजार १२२ मतदारांपैकी १२ हजार ५२९ स्ञी-पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याची सरासरी टक्केवारी ७३.१४ एवढी आहे.
सध्या चर्चा रंगत आहे नगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची. शहरातील चौका चौकात गप्पांमध्ये कोणत्या प्रभागात ,कोणाचा जोर होता, यावरही चर्चा सुरू असते.पहिल्या क्रमांकावर कोण व दुसऱ्या क्रमांकाची कोण मते घेणार, याचीही समीकरणे सांगणारे मोठ्या आवेशाने चर्चा करताना दिसतात. नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल तर प्रभागातील लढतीत कोण बाजी मारणार, याचीही गणित जुळवणे सुरू आहे. पक्षाची नेतेमंडळी आता उमेदवार व जनतेकडून आपल्या पक्षाची या लढतीत मतदानात काय स्थिती होती, याचा आढावा घेत आहेत. मतमोजणीची तारीख लांब असल्याने साऱ्यांचे भवितव्य जरी मतपेटीत बंद असले तरी चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे. कोणत्या पक्षाचे किती निवडून येणार व कोण नगराध्यक्षपदी बाजी मारणार, याच्याही गप्पा नागरिकात सुरू आहेत.