हळदी-कुंकुवाच्या निमित्ताने रोटरी क्लब मुरूम सिटीकडून वाचन संस्कृती जोपासण्याकरिता पुस्तक भेट
मुरूम, ता. उमरगा, दि. २३:
रोटरी क्लब मुरूम सिटीकडून संभाजीनगर व काबरा प्लॉट येथे बुधवार रोजी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना आपल्या बालकांनी अभ्यास कसा करावा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
भारतीय सांस्कृतिक परंपरा जोपासत, सामाजिक भान राखत व शैक्षणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बालकांना उपयुक्त ठरेल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना उमा सूर्यवंशी म्हणाल्या की, मुलांमध्ये अभ्यास व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे. प्रत्येक कुटुंबातील महिलांनी आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करणे, कुटुंबात शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येक महिलांची जबाबदारी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आईची भूमिका महत्त्वाची असते. हे पुस्तक मुलांना निश्चितच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता राठोड, सुकन्या स्वामी, मंगल दूधगे, प्रीती चौधरी, महादेवी बदोले, सुनीता निंबर्गे, गोकर्णा शेवाळकर, सविता शेडेकर, सुवर्णा खुळ, शारदा राठोड, राजश्री पवार आदींनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम ठरल्याने रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सामाजिक उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून हळदी कुंकाचे औचित्य साधून महिलांना पुस्तक म्हणून भेट देताना...