आई-वडील हेच पहिले गुरु, त्यांच्या कष्टांचे मोल जाणून त्यांचा सन्मान राखणे, हीच खरी शिवजयंती....सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे

वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद 

 मुरूम,दि.२३:

मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे मुलांमध्ये वाढत चाललेली दुरावस्था टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे, संवाद साधणे आणि आदर्श वर्तन ठेवणे आवश्यक आहे. आई-वडील हेच पहिले गुरु आहेत. त्यांच्या कष्टांचे मोल जाणून त्यांचा सन्मान राखणे, हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. शिवजयंतीच्या उत्सवी वातावरणात शहरवासीयांसाठी अशोक चौकातील मुख्य रस्त्यावर किसान शिवजन्मोत्सव समिती किसान चौक यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात वसंत हंकारे यांनी “ आई-वडील आणि संस्कारांचे पावित्र्य ” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. शनिवारी (ता. २२) रोजी रात्री आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती राहिली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, गौस शेख, सुजित शेळके, राजू मुल्ला, राहुल वाघ, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, संतोष कांबळे, सुनील राठोड, डॉ. खाजालाल ढोबळे, नागनाथ बदोले, विजयकुमार देशमाने, संजय सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंत हंकारे यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून शिवरायांच्या जीवनातील मातृसंस्कारांचे महत्त्व उदाहरणासह अधोरेखित केले. राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवराय घडले. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि योग्य संस्कार हीच प्रत्येक व्यक्तीच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आई-वडिलांना जीवनात कधीही विसरता कामा नये. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबव्यवस्थेचे जतन करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा अंगीकार करून कुटुंबातील नात्यांचे पावित्र्य जपण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली होती. किसान शिवजन्मोत्सव समिती किसान चौक अध्यक्ष रामहरी अंबर, उपाध्यक्ष स्वप्निल जाधव, सचिव विशाल जाधव, सहसचिव पवन फुकटे आदींनी पुढाकार घेऊन यशस्वी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. हा कार्यक्रम नागरिकांनी शांततेत व उत्साहात पार पाडत प्रेरणादायी व संस्कारमूल्यांची जाणीव करून देणारा ठरल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत होती. 

 फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा अशोक चौकात किसान शिवजन्मोत्सव समिती आयोजित व्याख्यानाप्रसंगी वसंत हंकारे बोलताना शरण पाटील व अन्य.
 
Top