' प्रोजेक्ट अमृत ' स्वच्छ जल, स्वच्छ मन या संत निरंकारी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
संत निरंकारी मिशनकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
मुरूम, ता. उमरगा, दि. २२ :
येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत संत निरंकारी मिशनतर्फे शाखा मुरूम अंतर्गत स्वच्छता अभियान रविवारी (ता. २२) रोजी उत्साहात राबविण्यात आले. सद्गुरुमाता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपाशीर्वादाने बाबा हरदेवसिंह महाराजांच्या ७२ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरु पूजा दिन साजरा करत अमृत प्रोजेक्ट : स्वच्छ जल, स्वच्छ मन या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात मिशनचे सेवादल सदस्य, सादसंगत, स्थानिक नागरिक, युवक-युवती व लहान मुलांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. अभियानादरम्यान परिसरातील झाडेझुडपे, मोकळ्या जागेत साचलेला घनकचरा गोळा करण्यात आला. स्वयंसेवकांनी हातमोजे व मास्कचा वापर करून सुरक्षिततेची काळजी घेत स्वच्छता केली. जमा केलेला कचरा योग्य प्रकारे विल्हेवाटीसाठी स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, सचिव कलाप्पा पाटील, लक्ष्मण राठोड यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ परिसर राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. संत निरंकारी मिशनतर्फे समाजहिताच्या विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सातत्याने जनजागृती केली जात असल्याचे मुरूम ब्रँचचे मुखी दयानंद साखरे यांनी सांगितले. या उपक्रमाची सांगता मनश्री मोटे हिच्या गुरु पूजा गीताने झाली. या अभियानामुळे प्रशालेचा परिसर अधिक स्वच्छ झाला असून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.