नळदुर्ग,दि.२५ :
झारीतल्या शुक्राचार्यांमुळे काळे धंदेवाल्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.नळदुर्ग शहरात मटका व्यवसाय पुन्हा तेजीत आला असून, पोलिसांच्या कारवाईचा धाक कमी झाल्याने 'ओपन-क्लोज'चा खेळ जोमात सुरू झाल्याची चर्चा नागरिकात रंगली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, शहरातच मटक्याचे कार्यालय सुरू करण्यात आले असून तेथून नळदुर्ग शहर व परिसरात एजंट नेमून मटका घेण्याचे काम जोमात सुरू आहे.
नळदुर्ग शहरात वाढती बेरोजगारी, शहराच्या बाहेरून गेलेले दोन महामार्ग यामुळे व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम, अविवाहित तरुणांचे झुंड या सगळ्या अडचणीचा पाढा वाचत असतानाच नळदुर्ग शहरावर एक नवीन संकट समोर येत आहे. दोन नंबरवाले (मटका बुकी..)
झटपट पैसा कसा कमावायचे यावर उपाय शोधणारे सुपीक डोकेबाज धुरंदर कामाला लागले आहेत. विविध अवैध धंदे सुरू करण्याचा सपाटा सुरु करत काहींनी "मटका बुकी" तर काहींनी जुगार अड्डा चालु केल्याची रसभरीत चर्चा ऐकावयास मिळत आहे .
मात्र पोलिस प्रशासनही गप्प आहे. मटका बुकींना रोखण्यासाठी पोलीस अधिक्षकांनाच कडक पावले उचलावी लागणार आहेत असे एकंदरीत वाटते. मात्र तोवर किती घराची राख रांगोळी होणार? मटका व्यवसाय अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त करणारा असल्याने शहरातून हा व्यवसाय हद्दपार करण्यासाठी कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. मात्र काही स्थानिक मंडळींकडूनच हा व्यवसाय सुरू झाल्याने याविषय शहरातील नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नव्याने सुरू झालेली मटका बुकी बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांतुन होत आहे.