नळदुर्ग: घनवन वृक्ष लागवड योजनेत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप ; दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिका-याकडे धाव
नळदुर्ग,दि.०८:
हरित धाराशिव अभियान २०२५ अंतर्गत नळदुर्ग येथील घनवन वृक्ष लागवड योजनेत गैरप्रकार व अनियमित्ता झाल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. या योजनेत संबंधित कंत्राटदार, तत्कालीन मुख्याधिकारी , विभाग प्रमुख , व लेखापाल यांचे त्वरित निलंबन करून गुन्हे नोंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी व सुधीर पोतदार यांनी कारवाईची मागणी केली आहे.
नळदुर्ग नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर २३६/७ क्षेत्र १०० आर मध्ये २३ लाख १८ हजार ९८० रुपये खर्चून विविध जातीचे ३० हजार वृक्ष लागवड करण्यात आले. या कामाची जाहिरात एका दैनिकात ९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन करण्यात आले. या कामाची तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता याचा उल्लेख नाही, टेंडर कालावधी कमी असल्यामुळे सर्व कामे एकाच टेंडरमध्ये दाखवण्यात आली, नर्सरी चालक हाच कामाचा ठेकेदार व साहित्य पुरवठादार आहे, सदर प्रक्रिया संशयास्पद आहे. कंत्राटदाराने कागदपत्रे देताना फसवणूक केल्याचे दिसत आहे, या कामाचे आलेले टेंडर एकाच कुटुंबातील तिघांनी भरले आहे. रोपे शासकीय नर्सरीतील मोफत घेणे अपेक्षित असताना रोपे विकत घेतली आहेत, काम करत असताना वापरलेले ट्रॅक्टर व ट्रॉलीचा मेळ लागत नाही, वृक्ष लागवडीसाठी असलेल्या मजुरांची यादी बोगस आहे. वृक्ष लागवडीसाठी पालिकेने आवाहन करत विद्यार्थी, बचत गटाच्या महिला व नागरिकांना बोलावले होते मात्र मजुरांचा खर्चही दाखवण्यात आला आहे. तसेच माती टाकते, शेणखत, वृक्षारोपणासाठी लागणारे इतर साहित्य याच्यामध्ये शंकास्पद बाबी आढळून येत असल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.