प्रोफेसर डॉ. महेश मोटे यांना ‘मानद डॉक्टरेट’ उपाधीने गौरव
मुरूम, ता. उमरगा, दि. १० :
शैक्षणिक, संशोधन आणि ज्ञानवर्धन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रातील समन्वयक प्रोफेसर डॉ. महेशकुमार नारायण मोटे यांना ‘मानद डॉक्टरेट’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. मोटे हे शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून राज्यशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून अविरतपणे कार्यरत असून ते एक व्यासंगी व नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ते पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी. अवॉर्ड झाली असून सध्या ६ विद्यार्थी पीएच. डी. संशोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या नावे ९ संदर्भ ग्रंथ व ७ स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, पेपर वाचन करून त्यांचे ८० पेक्षा अधिक संशोधन लेख नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. भारत सरकार डाक विभागाने माय स्टॅम्प मालिके अंतर्गत त्यांच्या नावे ६ टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत. त्यांनी सन २०१२ मध्ये थायलंड देशातील बँकॉक या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रिसर्च पेपर सादर करून थर्ड बेस्ट पेपर अवॉर्ड प्राप्त केले होते. त्यांनी आजवर ७५ च्या वर नामांकित संस्था, संघटनांकडून पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, अमेरिका या नामांकित विद्यापीठाकडून कल्याण, मुंबई येथे डी. लीट. पदवी तर इतिहास एवं पुरातत्व शोध संस्थान, संग्रहालय, बालाघाट (मध्यप्रदेश) या नामांकित पुरातत्त्व शोध संस्थेकडून सन २०२५ मध्ये विद्या सागर ची मानद उपाधी (डी. लीट.) पदवी ने सन्मानित झाले. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक अनुभवाचा आणि समाजाप्रती असलेल्या सामाजिक योगदानाचा विचार करून दिल्ली येथील फाउंडेशनच्या मूल्यांकन व संचालक मंडळाने या उच्च सन्मानासाठी त्यांची दि.९ मार्च २०२६ रोजी अधिकृतरीत्या दखल घेऊन त्यांना तसे प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.
या मानद पदवीमुळे डॉ. मोटे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सहकारी, विद्यार्थी, नातेवाईक, मित्रपरिवारांकडून विशेष कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.