श्रीराम प्रतिष्ठानकडून वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरूम, ता. उमरगा, दि. ३१ : 

येथील श्रीराम प्रतिष्ठानकडून इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. ३१) रोजी करण्यात आले होते. इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचा विषय सोशल मीडिया समाजाला जोडते का तोडते हा होता. 

या स्पर्धेत एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विषयाच्या दोन्ही बाजूंनी प्रभावी मते मांडली. स्पर्धकांनी सोशल मीडियाचे सकारात्मक व नकारात्मक पैलू स्पष्ट करून मुद्द्यांचे खंडन केले. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचा विषय मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण असा होता. या स्पर्धेत ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे बालपणावर होणारे परिणाम, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या यावर प्रभावी भाषणे सादर केली. प्रारंभी श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली कलशेट्टी होत्या. स्पर्धेसाठी परीक्षक प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. उमाकांत महामुनी, केसरजवळगाचे शिक्षक भुरे यांनी केले. स्पर्धेचा निकाल वक्तृत्व स्पर्धा वर्षा अंबुसे (प्रथम), वैशाली नागने (द्वितीय), शहबाज नदाफ (तृतीय) तर वादविवाद स्पर्धा वैष्णवी रुपनूर व ज्ञानेश्वरी सुरवसे (प्रथम), सोनाली जाधव व साक्षी जाधव (द्वितीय), सीमा राठोड व तेजस्विनी खजुरे (तृतीय) या स्पर्धकांना महेश निंबरगे, विजयकुमार कलशेट्टी, योगेश कोलडंगरे, बाबुराव बेगमपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व विचारशक्तीला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. अध्यक्ष समारोपप्रसंगी या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचारमंथनाची सवय आणि व्यक्त होण्याची कला विकसित होण्यास मोठी मदत होते.  आयोजक सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ, प्रशांत सोमवंशी, विकास शिंदे, रोहित स्वामी, शोभा बेगमपुरे, अनिल चव्हाण, मोहन करके, व्यंकटेश हंचाटे आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष येवले तर आभार प्रा. सतीश रामपुरे यांनी मानले. 

 फोटो ओळ  : मुरूम, ता. उमरगा येथील कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देताना स्पर्धक व अन्य.
 
Top