अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते 'गुढी पाडवा प्रवेश वाढवा' अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ 

धाराशिव,दि.०१:

हिंदू नववर्षाच्या मंगलमय प्रारंभाचे प्रतीक असलेल्या नुकत्याच संपन्न झालेल्या गुढी पाडव्याच्या निमिताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगांव ता. कळंब व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुढी पाडवा प्रवेश वाढवा अभियान’ चा जिल्हास्तरीय शुभारंभ दीपप्रज्वलन आणि गुढीपूजन करून उत्साहात 
करण्यात आला.
यावेळी जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील 
उपाध्यक्ष सौ. उषाताई गायकवाड, बांधकाम सभापती श्री. सिद्धेश्वर कोरे, समाजकल्याण सभापती श्री. विश्वास कोकणे, महिला व बालकल्याण सभापती सौ. पूजाताई शिंदे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे, पं.स सभापती सौ. राजश्रीताई वरपे, उपसभापती सौ. प्रणिताताई चव्हाण, प्रा.शि. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष श्री. संतोष देशपांडे, जि.प. सदस्य श्री. राजाभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

नवीन वर्ष, नवे संकल्प आणि उज्ज्वल भविष्यासाठीची नवी दिशा.. याच भावनेतून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हावे, त्याच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी आणि समाजात साक्षरतेचा प्रकाश अधिक तेजस्वी व्हावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. 

यावेळी गावातून लेझीम पथकाच्या जल्लोषात प्रभात फेरी व ग्रंथदिंडी काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, प्रत्येक घरातून किमान एक विद्यार्थी शाळेत दाखल होईल, शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, सुशिक्षित आणि प्रगत समाज घडवूया.. यासाठी सर्वांनी संकल्प करावा असे सांगण्यात आले.

याप्रसंगी सरपंच, शालेय शिक्षण समितीचे सदस्य तसेच परिसरातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top