डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
नागपूर, दि.०२:
महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय तर्फे व्यसनमुक्ती साठी पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ति विशेष व संस्थाना "राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार" द्वारे पुरस्कृत करुन त्यांचा अमूल्य कार्याचा गौरव करण्यात येतो. नुकताच हा पुरस्कार सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात मोठ्या थाटात पार पड़ला. नागपूर शहरातील उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमधारक डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना लेखक गटात त्यांच्या व्यसनमुक्तीच्या अमूल्य समाजकार्याचा सन्मान करण्यासाठी शासनाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही नागपूर शहरासाठी सोबतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश, शॉल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. प्रीतम भीमराव गेडाम विद्यार्थी जीवनापासूनच व्यसनमुक्तीच्या कामाला लागले, वर्ष २००८ ला समाजकार्य विषयात स्नातकोत्तर पदवीचे शिक्षण घेताना ते शिक्षक डॉ. विनोद गजघाटे सरांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी त्यांचा व्यसनमुक्ती केंद्राशी जुळले, डॉ. गेडाम यांनी लोकांना व्यसनावर मात करण्यास मदत करण्यासाठी हळूहळू पथनाट्ये, शिबिरे, समुपदेशन आणि मार्गदर्शन करायला सुरूवात केली. सोबत व्यसनाच्या समस्येवर लेखन करायला देखील सुरुवात केली, जनजागृतिसाठी त्यांचा जीवनातील वर्तमानपत्रात प्रकाशित पहिला लेख “नशेच्या गंभीर समस्येच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्प्रभाव” हा होता, तिथून त्यांच्या लेखनाची सुरुवात होऊन आज सामाजिक समस्येवर भारतात सर्वात जास्त द्विभाषिक प्रकाशित लेखांचा विक्रम त्यांचा नावावर नोंदवल्या गेला आहे. व्यसनमुक्तीसाठी प्रकाशित त्यांच्या लेखांवर वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. डॉ. गेडाम नेहमी सांगतात की, व्यसन एक असे विष आहे जे प्राशन करणाऱ्या व्यक्तीला तर वेदनेने महागड्या आजाराने अकाली मारते, पण त्याचे कुटुंब, नातेवाईक, शेजार आणि समाजावर सर्वांवर गंभीर परिणाम होतो. कुटुंबाची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती देखील खालावते, गैरवर्तन आणि गुन्हेगारी वाढते, तसेच व्यसन करणाऱ्यांचा लोक द्वेष ही करतात.
ह्या शासकीय सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), सुनेत्रा अजित पवार (उपमुख्यमंत्री), रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री), राहुल नार्वेकर (अध्यक्ष, विधानसभा), संजय शिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय), माधुरी मिसाळ (राज्यमंत्री, सामाजिक न्याय), अरविन्द सावंत (लोकसभा सदस्य) डॉ. हर्षवर्धन कांबळे (प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), दीपा मुधोळ - मुंडे (आयुक्त, समाज कल्याण, पुणे) होते. सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट यांनी डॉ. गेडाम यांचा समाजकार्याचे कौतुक केले, कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून समाज कल्याण विभागाचे आयुक्तांपासून, अधिकारी, कर्मचारी वर्ग, स्वयंसेवक सज्ज होते. खंजरी वादक कीर्तनकार सत्यपाल महाराज सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक कार्य आणि लेखन व्यतिरिक्त, डॉ. प्रीतम गेडाम जनजागृतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवितात. ते देशातील अनेक नामांकित संस्था आणि संघटनेशी जुडून आहेत. ते सध्या नागपूर मधील रायसोनी एज्युकेशन ग्रुपच्या सदर कॅम्पसमध्ये विभागप्रमुख म्हणून काम करतात. त्यांना यापूर्वी भारत आणि परदेशातून अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर शहरातील व्यक्तिविशेषला या प्रतिष्ठित शासकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा शहरवासियांना अभीमान आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.