नळदुर्ग,दि.०४:
नळदुर्ग नगरपालिकेत सत्ताधारी भाजप व शिंदे सेनेला स्पष्ट बहुमत असतानाही महत्त्वाच्या तीन सभा रद्द झाल्याने शहरातील नागरिकात
चर्चेला उधाण आले असुन समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल झाली आहे.
नळदुर्ग नगरपालिकेत २० पैकी ११ जागांवर भाजप-शिंदे सेनेचे नगरसेवक निवडून आले असून, जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासह एकूण १२ सदस्यांचे बहुमत आहे. तर काँग्रेसचे ९ नगरसेवक असून ते प्रभावी विरोधकांची भूमिका बजावत असल्याचे नमुद करुन भाजपच्या ९ नगरसेवकांच्या मागणीनुसार दि. १ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अचानक रद्द करण्यात आली. या सभेत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये सिटी सर्व्हे, मुख्य रस्ते व आरक्षित जागांवरील अतिक्रमण हटविणे, डीपी रस्त्यांसाठी भूसंपादन, वक्फ बोर्डाच्या जागेचा प्रश्न तसेच शहर हद्दवाढ यांसारख्या मुद्यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे याच दिवशी सकाळी ११ वाजता होणारी स्थायी समितीची बैठकही रद्द करण्यात आली. या बैठकीत सिमेंट रस्ते व गटारीच्या कामांबाबत दिलेले टेंडर रद्द करून नुकसान भरपाई वसूल करण्याचा महत्त्वाचा निर्णय अपेक्षित होता. तसेच दि. ३१ मार्च रोजी नियोजन व विकास समितीची बैठकही रद्द झाली होती. या बैठकीत बोरी नदीतील गाळ काढणे, शहर विकास आराखडा तसेच नगरपालिकेची नवीन इमारत उभारणी यांसारखे विषय होते.
सलग तीन महत्त्वाच्या सभा रद्द होणे यामागील नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कोणत्याही विषयांना विरोधकांकडून आक्षेप नसताना सभा का रद्द करण्यात आल्या, याबाबतही जोरदार चर्चा रंगल्या आहेत.