मुरूम येथे पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी कार्यशाळेचे उत्साहात ; माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती

मुरूम,दि.०४: डॉ सुधीर पंचगल्ले 

 श्री. माधवराव पाटील महाविद्यालयात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित दोन दिवसीय 'पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी कार्यशाळा महाअभियानाचे'  थाटात उद्घाटन करण्यात आले. 

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बसवराज पाटील आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना वैचारिक शिदोरी देण्यासाठी या विशेष निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाअभियानामागे प्रामुख्याने 'अंत्योदय' विचारांचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद आणि समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हा विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होत आहे. या माध्यमातून पक्ष संघटना केवळ वरच्या स्तरावरच नव्हे, तर थेट बूथ पातळीपर्यंत सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे. नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे आणि जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लावणे, हा या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
राजकारणात केवळ निवडणूक जिंकणे हेच ध्येय न ठेवता, कार्यकर्त्यांना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची सखोल जाण असावी, यासाठी या कार्यशाळेत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये वक्तृत्व कौशल्य, जनसंपर्क आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या, याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी जनसंघ ते जनता पक्ष आणि आजचा भारतीय जनता पक्ष या प्रवासातील पक्षाची जडणघडण व प्राप्त झालेली सत्ता या विषयावर सविस्तर मांडणी केली. या उद्घाटन प्रसंगी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, या अभियानाचे धाराशिव जिल्हा संयोजक दत्ता राजमाने, अ‍ॅड. अनिल काळे, मुरूमचे नगर उपाध्यक्ष रमेश चव्हाण, मुरूम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर यांच्यासह मुरूम मंडळातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा  उल्हास घुरघुरे यांनी केले.
 
Top