हेरंब कुलकर्णी यांची एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यासाठी समिती सदस्यपदी निवड

नळदुर्ग,दि.२६:

 एकल महिलांच्या प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मसुदा समिती नेमली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे .महिला बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी असून साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचाही या समितीत समावेश आहे.

  एकल महिला समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक   विजय  जाधव व तुळजापूर तालुका समन्वयक मारुती बनसोडे , परंडा तालुका समन्वयक झुल्फिकार काझी,यांनी या निर्णयाबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन केले आहे.

  एकल महिलांची मोठी संख्या बघता स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. २०११ साली महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७०लाख असेल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज होती.
 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच  धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्या घोषणेच्या अंमलबजावणीची  साऊ एकल महिला समितीने विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठका घेतल्या व मसुदा समिती स्थापन करण्याचे महिला बालकल्याण विभागाला सूचित केले.महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोघींनीही त्यानंतर एकल महिला धोरण विषयावर चर्चा करण्यासाठी बैठका घेऊन समिती स्थापन केली.

राज्यात असलेल्या सर्व शासकीय विभाग, अधिकारी,लोकप्रतिनिधी   या प्रश्नावर व महिला प्रश्नावर काम करत असलेल्या सर्व संस्था,संघटना यांच्याशी ही समिती चर्चा करेल व विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण, बदल,नवीन प्रस्ताव करून राज्याचे धोरण होईल. या धोरणामुळे एकल महिलांच्या प्रश्नावर सर्व शासकीय विभाग संवेदनशील होतील व शासन आणि समाजासाठी या महिलांचे प्रश्न महत्वाचे ठरतील. एकल महिला यांच्या अपेक्षा आणि भावना याचे प्रतिबिंब नक्कीच या एकल महिला धोरणात असेल अशी एकल महिलांची भावना असल्याची माहिती मारुती बनसोडे यांनी दिली.
 
Top