धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच; काँग्रेसकडून धीरज देशमुख, अशोक जगदाळे, भाजपकडून बसवराज पाटील,  दत्ताभाऊ कुलकर्णी, अर्चना पाटील-चाकूरकर, नितीन काळे यांची नावे चर्चेत

 यांची नावे चर्चेत

नळदुर्ग,दि.२२:


राज्यातील गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिककाळ रखडलेल्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्याने १८ जूनला मतदान होणार आहे. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जागा जाणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येणार असल्याने या मतदारसंघातून माजी आमदार धीरज देशमुख, अशोक जगदाळे यांच्या नावाची चर्चा आहे. 

2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व नसतानाही विजय मिळवला होता.  भाजपचे सुरेश धस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 72 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत जगदाळे यांना 452 मते पडली होती तर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 525 मते मिळाली होती.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तीन जिल्ह्यात भाजपने विजय मिळवला आहे. धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यातील संख्याबळ पाहता याठिकाणी भाजपचे एकहाती वर्चस्व दिसून येत आहे. लातूर, धाराशिव जिल्हा परिषद आणि तीन जिल्ह्यातील 18 नगरपालिका व सहा नगर पंचायतीपैकी बहुतांश ठिकाणी भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम आहे. यंदा या जागेवर भाजपकडून माजी आमदार बसवराज पाटील, धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  भाजपचे सुनिल चव्हाण ,अर्चना पाटील-चाकूरकर, नितीन काळे यांची नावे चर्चेत आहे.

धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघाचा इतिहास पाहता या ठिकाणी 1994 मध्ये काँग्रेसकडून नरेंद्र बोरगावकर विजयी झाले होते. त्यानंतर 2000, 2006 व 2012 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांनी हॅट्ट्रिक केली होती. तर त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडत अदलाबदल करण्यात आली होती. यावेळेस संख्याबळानुसार धाराशिव-बीड-लातूर ही जागा काँग्रेसच लढण्याची दाट शक्यता आहे.

 

 धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात एकूण 881 मतदार आहेत. बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक झालेली नाही.  त्यामध्ये भाजपचे 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे.  

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश धस बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती. पण अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीत रंगत आणली होती. त्यावेळी जगदाळे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने असताना त्याठिकाणी 100 ते 125 मतदार भाजपने फोडत विजय मिळवला होता.  

त्यावेळी चुरशीने लढत देणाऱ्या अशोक जगदाळे यांनी ही निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून जगदाळे यांनी मतदारसंघातील जनसंपर्क वाढवला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यास ही निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे जगदाळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. दुसरीकडे गेल्या निवडणुकीतील माहितीगार असलेल्या जगदाळेंना निवडणूक रिंगणात उतरावून चुरस आणण्याचे प्लॅनिंग काँग्रेसकडून केले जात असल्याचे समजते.

सध्यस्थितीत काँग्रेसकडून माजी आमदार धीरज देशमुख व धाराशिव जिल्हयातील काँग्रेस नेते अशोक जगदाळे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसकडून या दोन नावापैकी एक नाव फायनल करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Top