धाराशिव लातूर बीड विधान परिषदेचा आमदार ९८८ मतदार ठरविणार, १८ जूनला मतदान होवुन २२ जुन रोजी मतमोजणी होणार
धाराशिव , दि.०९: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी तीनही जिल्ह्यांमध्ये मिळून २९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मतदारसंघातील मतदारांमध्ये ४९९ पुरुष आणि ४८९ महिला सदस्यांचा समावेश आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे ६३ सदस्य आणि नगरपंचायत व नगरपालिकांमधील २५४ सदस्य, लातूर जिल्हा परिषदेचे ६९ सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २९८ सदस्य, तर बीड जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपालिकांचे ३०४ सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात ८, लातूर जिल्ह्यात १० आणि बीड जिल्ह्यात ११ अशी एकूण २९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रे संबंधित तहसील कार्यालयांमध्ये असतील. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी निश्चित करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी धाराशिव येथे ९ मतदान केंद्राध्यक्ष व ३६ मतदान अधिकारी, लातूर येथे ११ केंद्राध्यक्ष व ४४ मतदान अधिकारी, तर बीड येथे १२ केंद्राध्यक्ष व ४८ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय राखीव कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी धाराशिवमध्ये चार, लातूरमध्ये पाच आणि बीडमध्ये पाच असे एकूण १४ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तीन टप्प्यांत घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरा टप्पा १२ व १३ जून रोजी, तर अंतिम प्रशिक्षण १७ जून रोजी होणार आहे.
मतदान केंद्रांवरील प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिवमधील आठ केंद्रांसाठी ११, लातूरमधील १० केंद्रांसाठी १३ आणि बीडमधील ११ केंद्रांसाठी १४ असे एकूण ३८ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचे वितरण १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथून करण्यात येणार आहे. मतदानानंतर साहित्य स्वीकृतीची प्रक्रिया भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), धाराशिव येथे पार पडणार असून, २२ जून रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.