धाराशिवमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
धाराशिव, दि.. ९ :
महाराष्ट्रातील वाढत्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने येत्या १३ आणि १४ जून २०२६ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव येथील तेरणा कॉलेजसमोरील रायगड फंक्शन हॉल येथे हे शिबिर संपन्न होणार आहे.
राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरणापासून आतापर्यंत ५० हून अधिक भोंदू बुवांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यातील नवीन-जुन्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
या दोन दिवसीय शिबिरात अंनिसची कार्यपद्धती, बुवाबाजीचे सत्य, चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष, महिला आणि अंधश्रद्धा, मानसिक आजार, जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार कायदा यासह भूतबाधा, करणी-भानामती यांसारख्या समस्यांवर वैज्ञानिक उपाययोजनांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
याशिवाय कार्यकर्त्यांसाठी विविध उपक्रम आणि आकाशदर्शनासारख्या उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून, सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था, आवश्यकतेनुसार निवासाचीही सोय उपलब्ध करण्यात येईल. शिबिराची वेळ सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० अशी असेल. प्रवेश मर्यादित असल्याने नाव नोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. तरी, अंनिस सोबत काम करू इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी अँड. देविदास वडगावकर, रवींद्र मैंदाड, प्रा. डॉ. महेश मोटे, चंद्रकांत उळेकर, रमेश माने यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.