भक्तिस्थळ येथे ‘शिवा वीरशैव-लिंगायत गोलमेज परिषद २०२६’ संपन्न; जनगणनेत ‘वीरशैव-लिंगायत’ नोंदीचा ठराव

नळदुर्ग,दि.१३:

 अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना (शिवा संघटना) यांच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने अहमदपूर येथील भक्तिस्थळ येथे आयोजित करण्यात आलेली ‘शिवा वीरशैव-लिंगायत गोलमेज परिषद २०२६’ उत्साहात संपन्न झाली.
 परिषदेत देशभरातील शिवाचार्य, विरक्त मठाधिपती, शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक, संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजातील अभ्यासक व विचारवंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अशी माहिती संघटनेचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष संजय बजावले यांनी दिली.

परिषदेत सखोल चर्चा करून दोन महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आगामी भारतीय जनगणना २०२७ मध्ये धर्म नोंदविताना ‘हिंदू’ असा उल्लेख न करता ‘वीरशैव-लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद करावी, तसेच जात नोंदविताना संबंधित उपजातीपूर्वी ‘लिंगायत’ हा शब्द जोडावा, असा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला.

याशिवाय, नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढून दोन प्रमुख मागण्या केंद्र सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेल्या बसव कल्याण येथील ‘मूळ अनुभव मंडप’ व ‘परस कुटा’ या ऐतिहासिक स्थळांना केंद्र सरकारने ताब्यात घेऊन जागतिक पर्यटकांसाठी खुले करावे, तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने देशभर शासकीय स्तरावर साजरी करावी, अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.

संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी परिषदेची माहिती देताना सांगितले की, या परिषदेस ४८ शिवाचार्य, १५० शिवकीर्तनकार, ३०० हून अधिक संघटनात्मक पदाधिकारी तसेच १०० समाज अभ्यासक व प्रतिष्ठित व्यक्तींसह ६०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

परिषदेत मंजूर झालेल्या ठरावांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी देशातील संपूर्ण वीरशैव-लिंगायत समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 
Top