महिनाभरानंतरही अणदूर–नळदुर्ग जुना मार्ग बंदच; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांत संताप

नळदुर्ग, दि. १३ : 

अणदूर ते नळदुर्ग दरम्यानचा जुना रस्ता वाहतुकीसाठी तातडीने खुला करावा, या मागणीसाठी महिनाभरापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अणदूर–नळदुर्ग हा जुना मार्ग बंद असल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने प्रवासाचे अंतर वाढले असून वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांच्या मते, जुना मार्ग सुरू झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर होऊन वाहतूक सुरळीत होईल. मात्र, वारंवार निवेदने देऊन व आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी नळदुर्ग येथे आंदोलन करून रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती.

स्थानिक व्यापारावर गंभीर परिणाम

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने नळदुर्ग शहरातील व्यापारावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहराचा राष्ट्रीय महामार्गाशी असलेला थेट संपर्क तुटल्याने अनेक हॉटेल्स, ढाबे व इतर व्यावसायिक आस्थापनांचा व्यवसाय मंदावला असून काही ठिकाणी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. यामुळे व्यापारी, व्यावसायिक तसेच तरुण वर्ग आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याचे सांगितले जात आहे. अणदूर–नळदुर्ग जुना मार्ग तातडीने सुरू करण्याबरोबरच नळदुर्ग शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करून तो पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

संतोष पुदाले,  शिवसेना (उबाठा) , नळदुर्ग शहर प्रमुख 

अणदूर - नळदुर्ग -जळकोटचा हा
 जुना मार्ग खुला करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र  अद्यापही प्रशासनाने यांची दखल घेतली नाही.   हा मार्ग त्वरित खुला करावे अन्यथा   पंधरा दिवसांनंतर शिवसेना पुन्हा चक्काजाम आंदोलन करणार आहे.
 
Top