सरकारी जमिनींच्या विक्रीचा गंभीर आरोप; गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी; भूमाफिया व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताची चर्चा; नागरिकांमध्ये संताप

नळदुर्ग, दि. १४ :

नळदुर्ग शहरातील गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेभोवती नव्याने वादाचे वादळ निर्माण झाले असून, काही भूमाफियांनी कथितरित्या सरकारी जमिनींची विक्री केल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. या प्रकरणात संबंधित प्रशासकीय अधिकारी, महसूल विभागातील कर्मचारी तसेच गुंठेवारी प्रक्रियेशी संबंधित घटकांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्ग शहरातील विविध भागांमध्ये  सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ( ओपन स्पेस)  भुखंड आहे .या जागांवरील बांधकामे आणि व्यवहार गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेद्वारे वैध ठरविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी मूळ मालकी हक्काचे स्पष्ट दस्तऐवज नसतानाही भूखंडांची खरेदी-विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित जमिनी सरकारी मालकीच्या असल्याची माहिती असूनही त्यांचे व्यवहार करण्यात आले असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या व्यवहारांमध्ये नेमके कोण लाभार्थी आहेत, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गुंठेवारी नियमितीकरणाच्या नावाखाली अनेक नियमांना बगल देण्यात आली. काही भूखंडांच्या नोंदी, सातबारा उतारे, मालकी हक्काचे पुरावे आणि नगरपरिषदेतील मंजुरी प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, शहरातील अनेक नागरिकांनी शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक निधी लेखा विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवेदने देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करून काही व्यक्तींनी आर्थिक लाभ मिळविला असल्यास त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशीही मागणी होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शहरातील गुंठेवारी प्रक्रियेत झालेल्या सर्व मंजुरी, नकाशे, मालकी हक्क तपासणी, महसूल अभिलेख आणि नगरपरिषदेचे ठराव यांची न्यायालयीन किंवा उच्चस्तरीय चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

याबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी या आरोपांमुळे नळदुर्गमधील गुंठेवारी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. चौकशीअंतीच आरोपांमागील सत्य समोर येणार असल्याने नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
 
Top