विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्गात महायुतीचा भव्य संवाद मेळावा
नळदुर्ग, दि. १२ :
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचा भव्य संवाद मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपचे गटनेते , नगरसेवक दत्तात्रय दासकर यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत आगामी विधान परिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
नळदुर्ग येथे आयोजित या संवाद मेळाव्यास औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा नेते सुनील (मालक) चव्हाण, जिल्हा परिषद सभापती सिध्देश्वर कोरे, नळदुर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जहागिरदार, सुशांत भुमटर ,महायुतीचे नगरसेवक, तसेच पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उमेदवार बसवराज पाटील यांनी आगामी काळातील विकासाची दिशा स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकासाभिमुख नेतृत्वाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया, नियोजन आणि संघटनात्मक बांधणी याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संवाद मेळाव्यामुळे महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नगरसेवक शशिकांत पुदाले, निरंजन राठोड,रिजवान काझी, तसेच नगरसेविका छमाबाई राठोड, राणी जाधव, साक्षी नळदुर्गकर, सुमन ठाकूर, मीनाक्षी काळे यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.