नळदुर्ग नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांचे ‘विशेष लेखापरीक्षण’ करा
प्रशासकीय कार्यकाळातील विकासकामे, खरेदी व्यवहार व अमृत योजनेतील खर्चाची चौकशी करण्याची मागणी

नळदुर्ग, दि. १२ : नळदुर्ग नगरपरिषदेचे सन २०२२ पासून नियमित लेखापरीक्षण झाले नसल्याने सध्या सुरू असलेल्या रखडलेल्या लेखापरीक्षणादरम्यान आर्थिक अनियमिततेच्या काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या विविध विकासकामे व योजनांच्या खर्चाचे सखोल, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी  नगरसेवक  सुधीर पोतदार यांनी मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा विभाग, धाराशिव यांच्याकडे केली आहे.


पोतदार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, घनवन वृक्षलागवड योजना, घनकचरा व्यवस्थापन, तुरटी व ब्लिचिंग पावडर खरेदी, सभागृह बांधकामे, सिमेंट रस्ते, गटारे, उद्यान विकास योजना तसेच अमृत २.० पाणीपुरवठा योजनेतील खर्च व कामकाजाबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. या सर्व बाबीं विषयी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि नगरविकास विभागाकडे पुराव्यांसह तक्रारी सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नगरपरिषदेच्या विविध कामांमध्ये शासन निधीचा अपहार व आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या सर्व व्यवहारांचे स्वतंत्र व विशेष लेखापरीक्षण करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आवश्यक असल्यास संबंधित पुरावे उपलब्ध करून देण्याची तयारीही तक्रारदारांनी दर्शविली आहे.
सध्या सुरू असलेल्या लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता, नियमबद्धता आणि निष्पक्षता राखण्यासाठी संबंधित लेखापरीक्षकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. आर्थिक अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करून शासनाचा निधी वसूल करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

नळदुर्ग नगरपरिषदेच्या कारभाराबाबत निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांच्या पार्श्वभूमीवर या मागणीमुळे स्थानिक प्रशासन आणि लेखापरीक्षण यंत्रणेवर लक्ष केंद्रीत झाले असून, आगामी काळात या प्रकरणात कोणती भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top