प्रतिकात्मक छायाचित्र 

चिवरी पाटीजवळ गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उघड; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्ग, दि. १५ : 

गोवंशीय जनावरांना निर्दयपणे कोंबून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख ४ हजार रुपयांचे गोवंशीय जनावरे व वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील चिवरी पाटी परिसरात रविवारी (दि. १४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासणी केली असता चार मालवाहू वाहनांमधून गोवंशीय जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी महादेव इंद्रजीत कांबळे (रा. भंडारी, जि. धाराशिव), विशाल विकास बनसोडे (रा. वडगाव देव, ता. तुळजापूर), महादेव गोविंद धाकतोडे (रा. सारोळा, ता. तुळजापूर) व लखन हनुमंत मोटे (रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान एमएच-१३ एएन-९७५३ या वाहनात ३ जर्सी गायी व ४ खोंडे, एमएच-१३ सीयू-५१७९ या वाहनात १ जर्सी गाय व ५ कालवडी, एमएच-२५ एजे-२९०८ या वाहनात ५ रेडे, १ वगार, ३ कालवडी व ३ खोंडे, तर एमएच-२४ एयू-३५९६ या वाहनात ३ जर्सी गायी आढळून आल्या. जनावरांना अत्यंत कमी जागेत कोंबून ठेवण्यात आले होते तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११(१) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(अ) व ९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.



 
Top