तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती; नळदुर्गातील पानटपऱ्या बंद, भेसळखोर आणि गुटखा माफियांमध्ये खळबळ
नळदुर्ग, दि. १४ : शिवाजी नाईक
कडक शिस्त, धाडसी निर्णय आणि नियमांची तडजोड न करणारी कार्यपद्धती यासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच राज्यभर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेची धास्ती आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असून नळदुर्ग शहरात त्याचे स्पष्ट पडसाद उमटताना दिसत आहेत.
रविवारी सकाळपासूनच नळदुर्ग शहरात आणि परिसरात एफडीएचे पथक पुन्हा छापेमारी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चेमुळे गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक पानटपरी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शहरातील बहुतांश पानटपऱ्यांचे शटर खाली आले आणि अनेक दुकाने दिवसभर बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात नळदुर्ग शहरात एफडीएच्या पथकाने धाड टाकून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जर्दाचा साठा जप्त केला होता. या कारवाईत एकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरातील बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर आता आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने विक्रेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नभेसळीविरोधातही आक्रमक मोहीम उघडली आहे. विशेषतः पाम ऑईल, स्टार्च आणि चीजसदृश पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या तथाकथित ‘अॅनालॉग पनीर’च्या विक्रीवर कठोर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना खऱ्या पनीरच्या नावाखाली नकली उत्पादन विकून फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर प्रशासनाची करडी नजर असल्याने अनेक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या मोहिमेचा परिणाम म्हणून काही मोठ्या बाजारपेठांमध्ये शुद्ध पनीरचा तुटवडा जाणवत असला, तरी ग्राहकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्यांची भावना असल्याने मुंढे यांच्या निर्णयांना व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे.
याशिवाय आरोग्य क्षेत्रातील काही गैरप्रकारांनाही आळा घालण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. अनेक रुग्णालयांकडून रुग्णांना विशिष्ट मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, कोणत्याही रुग्णावर अशी सक्ती करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही अधिकृत औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कायद्याची केवळ प्रभावी अंमलबजावणी करून तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच इशारा दिला आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते, भेसळखोर आणि नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.
"कारवाई झाली नसली तरी कारवाईची शक्यता पुरेशी ठरते," अशी चर्चा रविवारी नळदुर्ग शहरातील चौकाचौकांत रंगली होती. तुकाराम मुंढे यांच्या धडक कार्यशैलीमुळे येत्या काळात राज्यभर अन्नसुरक्षा आणि ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी आणखी मोठ्या मोहिमा राबवल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.