खतांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्रशासनाचा चाप; तुळजापूर तालुक्यात दोन कृषि सेवा केंद्रांवर कारवाई; सहा परवाने निलंबित

नळदुर्ग, दि. १९ जून :

 खरीप हंगाम २०२६ च्या तोंडावर शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या खतांबाबतच्या तक्रारींची दखल घेत कृषि विभागाने तुळजापूर तालुक्यात धडक तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेत अणदूर, नळदुर्ग व होर्टी परिसरातील कृषि सेवा केंद्रांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्याने अणदूर व नळदुर्ग येथील ओंकार कृषि सेवा केंद्रावर कारवाई करत बियाणे, खते व कीटकनाशकांचे एकूण सहा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कृषि विभागाच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत संबंधित केंद्रांमधील काही खतांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची पडताळणी केली. संशयित खतांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून संबंधित खतांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, तालुक्यातील इतर कृषि सेवा केंद्रांची तपासणीही सुरू असून ज्या ठिकाणी नियमभंग आढळेल त्यांच्यावर सुनावणी घेऊन तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.

नियमभंग आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा

जादा दराने खत विक्री करणे, खतांसोबत इतर वस्तूंची सक्तीने विक्री (लिंकिंग), साठा नोंदवही अद्ययावत न ठेवणे, उपलब्ध साठ्याची माहिती भावफलकावर न दर्शविणे, परवान्यात नसलेल्या निविष्ठांची खरेदी-विक्री करणे, शेतकऱ्यांना अधिकृत पावती न देणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे अथवा परवान्यात गोदामाचा समावेश नसणे अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

कृषि निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रांचाच वापर करावा. खरेदीची पक्की पावती घेऊन त्यावरील तपशील व विक्रेत्याची स्वाक्षरी तपासावी. अनुदानित रासायनिक खत खरेदी केल्यानंतर ई-पॉस मशीनवरील बिल घेणे आवश्यक आहे. तसेच बियाण्यांची पिशवी, टॅग, वेस्टन व काही नमुना बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावेत. बियाण्यांची अंतिम मुदत आणि सिलबंद स्थितीची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांची बियाणे, खते व कीटकनाशकेच खरेदी करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.

"तक्रार आली आणि प्रशासन झाले ॲक्शन मोडमध्ये"

खरीप हंगाम सुरू होत असतानाच शेतकऱ्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत कृषि विभागाने केलेल्या कारवाईमुळे खत व बियाणे विक्रीतील अनियमिततेवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाभरातील कृषि सेवा केंद्रांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
 
Top