शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत ‘जलसमाधी आंदोलन’चा इशारा

नळदुर्ग, दि. १९ जून :


शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथे गुरुवारी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अक्कलकोट रोड येथून सुरू झालेला हा मोर्चा अपर तहसील कार्यालयावर धडकला. बहुसंख्य ट्रॅक्टर आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकरी, पालक व नागरिकांमुळे शहरातील प्रमुख मार्ग घोषणांनी दणाणून गेले.

शेतकरी संघर्ष समितीने सरसकट कर्जमाफी, पीक विम्याची थकीत रक्कम तात्काळ वितरित करणे, एक रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल अदा करणे, तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी केली.


याशिवाय, शेतकऱ्यांच्या धान्य योजनेचे दोन वर्षांपासून थकीत असलेले पैसे तत्काळ देऊन अन्नधान्य वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. यापुर्वी प्रशासनाने शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.


मोर्चा दरम्यान मौजे गुळहळी येथील शेतकरी विठ्ठल निकम यांचे सर्पदंशामुळे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना सादर करण्यात आले.

यावेळी बोलताना शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी सरकारला थेट इशारा दिला. “शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात नरिमन पॉईंट येथे समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी महेश घोडके, महादेव बिराजदार, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार टीका करत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
मोर्चात व्यंकट पाटील, पंडित पाटील, संतोष फडतरे, स्वामीनाथ माळगे, संजय कलकटे, गुलाब शिंदे, अजबुद्दीन शेख, बालाजी ठाकूर, प्रताप ठाकूर, रहिमान शेख, तोलू पाटील, सोनू पाटील, श्रीकांत पोतदार, मानसिंग ठाकूर, अनिल राठोड, ज्ञानोबा सुरवसे, गणपत सुरवसे, मदनराजे पाटील, ताजोद्दीन सय्यद, सगीर शेख, मुदस्सर शेख, महोद्दीन शेख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

"कर्जमाफीपासून ऊस बिलापर्यंत... शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर; सरकारने ऐकले नाही तर मुंबईत जलसमाधी!" अशीच चर्चा मोर्चानंतर परिसरात रंगली होती.

 
Top