नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रशासकीय कालावधीत झालेल्या विकास कामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
नळदुर्ग, दि.१० :
नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रशासकीय कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या गुणवत्तेबाबत, खर्चाबाबत आणि कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत सुरु करण्यात आलेल्या विकास कामापैकी आजघडीला कांहीं कामे पूर्ण झाली.तरी काही कामे अपूर्ण आहेत
नळदुर्ग शहरातील स्वच्छतेचे काम, वृक्ष लागवड ,रस्ते, वसंतराव नाईक स्मारक, सभागृह , बगीचा, सभागृह, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. मात्र काही कामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर, अपूर्ण कामे, तसेच मंजूर निधी आणि प्रत्यक्ष काम यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्रशासकीय कालावधीत मंजूर झालेल्या सर्व विकासकामांची तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षणाद्वारे स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. संबंधित विभागांनी कामांचे मोजमाप, खर्चाची कागदपत्रे, निविदा प्रक्रिया आणि गुणवत्तेची तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी होत आहे.
नागरिकांच्या मते, चौकशीमुळे विकास कामांमधील पारदर्शकता वाढेल आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, या मागणीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी लक्षण कुंभार यांच्याशी संपर्क साधले असता फोन घेण्यास टाळाटाळ केली.
सुधीर पोतदार, न.प. सदस्य नळदुर्ग
नळदुर्ग नगरपालिकेतील प्रशासकीय कालावधीमध्ये जे कामे मंजूर करण्यात आली व केली गेली याची उच्चस्तरीय चौकशी तर करण्यात यावी. झालेल्या कामाचा मोजमाप करून त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी व संबंधितांकडून शासनाची झालेली नुकसानही वसूल करण्यात यावे ,प्रशासकीय कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिका-याविरुध्द कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता नगरसेवकाच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. या बाबीकडे जर प्रशासन गांभीरपणे दखल घेत नसेल तर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर रस्त्यावर उतरून काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे नगरसेवक सुधीर पोतदार यांनी सांगितले.