‘मृत्यूचा सापळा’ ठरत असलेला नळदुर्ग बाह्यवळणावरील पूल; अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
फलक नाही, दिवे नाहीत, सर्व्हिस रोडही बंद,
नळदुर्ग, दि. २४ जून :
सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर–नळदुर्ग मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नळदुर्ग शहराबाहेर बाह्यवळण रस्ता उभारण्यात आला. मात्र, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारलेला हा पूल आता वाहनचालकांसाठीच डोकेदुखी ठरत असून अपघातांना निमंत्रण देणारा ‘धोक्याचा बिंदू’ बनल्याची भावना प्रवासी व स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सोलापूर–हैदराबाद महामार्गावरून दररोज हजारो मालवाहू, प्रवासी व खासगी वाहनांची वर्दळ सुरू असते. नळदुर्ग बाह्यवळणावरील तुळजापूर मार्गाच्या पुलाखालून मुख्य राष्ट्रीय महामार्ग जातो. या ठिकाणी वाहनांना दिशा बदलताना अत्यंत अरुंद व धोकादायक वळण घ्यावे लागत असल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहन वळवताना चालकांचा जीव टांगणीला
नळदुर्ग व तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पूल गाठण्यासाठी अत्यंत अरुंद जागेतून वळण घ्यावे लागते. अनेकदा मोठ्या वाहनांना पूर्ण वळण घेणे शक्य होत नसल्याने चालकांना वाहन मागे घेऊन पुन्हा पुढे सरकावे लागते. या प्रक्रियेत वाहन काही काळ रस्त्यावर आडवे ,उभे राहत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व्हिस रोड बंद; वाहनचालकांची गैरसोय
उमरगा येथून नळदुर्ग किंवा तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असलेला पर्यायी सर्व्हिस रोड बंद असल्याने चालकांना मुख्य महामार्गावरूनच धोकादायक पद्धतीने वळण घ्यावे लागत आहे. त्याचवेळी नळदुर्ग व तुळजापूरकडून येणारी वाहने अचानक समोर येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढत असून वारंवार कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
पूर्वीही घडले अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या परिसरात यापूर्वी अपघात घडले आहेत. मात्र अद्यापही वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
‘हे उपाय तातडीने करा’
वाहतूक तज्ज्ञ व स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये
पुलाच्या दोन्ही बाजूंना वर्तुळाकार जंक्शन उभारणे, स्पष्ट दिशादर्शक फलक बसविणे,
रिफ्लेक्टिव्ह ग्लास बिट्स ( सुरक्षा आरसे) बसविणे, पुलाखालील बंद असलेले सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करणे, सर्व्हिस रोड व पुलावर हायमास्ट दिव्यांची व्यवस्था करणे, अणदूर–नळदुर्ग–मुर्टा पाटीपर्यंतचा जुना महामार्ग वाहतुकीसाठी खुला करणे,
या उपाययोजना झाल्यास पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक सुरक्षित होईल असे मत व्यक्त केले जात आहे.
भाविक व पर्यटकांनाही होईल दिलासा
ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला, तुळजाभवानी मंदिरास भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वर्षभर मोठी असते. जुना महामार्ग व सर्व्हिस रोड कार्यान्वित झाल्यास या पर्यटकांना सुरक्षित व सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
डॉ.जिंतेद्र कानडे, जिल्हा परिषद सदस्य, धाराशिव
तिर्थक्षेत्र अणदुर ,ऐतिहासिक नळदुर्ग शहर, मुर्टा पाटीपर्यंतचा जाणारा जुना महामार्ग सुरू करण्याबाबत आंदोलन करुनही प्रशासनाकडून
अद्याप पर्यंत कांहींच हालचाल झाली नाही.त्यामुळे सर्व पक्षीय बैठक घेऊन फुलेवाडी टोलनाका येथे लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.