नळदुर्ग येथिल  किल्ल्यातील संग्रहीत फोटो 
 
नळदुर्ग  ऐतिहासिक किल्ल्यातील  अतिक्रमणावर कारवाई; पुरातत्त्व विभागाची नोटीस जारी 

नळदुर्ग, दि. २६ जून :

नळदुर्ग किल्ला परिसरातील राज्य संरक्षित स्मारक क्षेत्रात करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पुरातत्त्व विभागाने कठोर भूमिका घेत संबंधितांना नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सहायक संचालक (पुरातत्त्व) कार्यालयाकडून ही नोटीस दि.२३जुन रोजी जारी करण्यात आली असून अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या नोटिसीमुळे अतिक्रमण धारकात खळबळ उडाली आहे.

नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नळदुर्ग भुईकोट किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असून त्याच्या संरक्षित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारक व पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत संबंधित व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, संबंधितांनी केलेले अतिक्रमण त्वरित स्वतःहून काढून टाकावे, अन्यथा शासनाकडून ते हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय, नियमांचे पालन न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला असून अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधितांना दि .२९ जुलै  रोजी सकाळी  ११ वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या नोटीसीची प्रत धाराशिव जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच नळदुर्ग नगरपरिषद प्रशासनालाही पाठविण्यात आली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top