स्टॉक रजिस्टरला पाय फुटले? नळदुर्ग पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नोंदी गहाळ; कारभारावर संशयाचे सावट; 
तीन महिन्यांपासून नगरसेवकांचा पाठपुरावा; 'रजिस्टर नाही'पासून 'हस्तांतरच झाले नाही'पर्यंत बदलती उत्तरे

नळदुर्ग, दि. २६ जून : 

नळदुर्ग नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागा  मधील साहित्य खरेदी, तुरटी व ब्लिचिंग पावडरच्या स्टॉकची नोंद असलेले महत्त्वाचे स्टॉक रजिस्टर गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकारामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "रजिस्टरला पाय फुटले का?" अशी उपरोधिक चर्चा शहरात रंगू लागली आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षातील नगरसेवक सुधीर पोतदार यांनी दि. २६ मार्च २०२६ रोजी पालिकेतील स्टॉक रजिस्टरच्या सत्यप्रतीची मागणी अर्जाद्वारे केली होती. मात्र, सलग तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही संबंधित कागदपत्र उपलब्ध करून देण्याऐवजी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवीची भूमिका घेतली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरुवातीला "रजिस्टर सापडत नाही" असे सांगण्यात आले. त्यानंतर "पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी दीर्घ रजेवर जाताना स्टॉक रजिस्टर हस्तांतरित केले नाही," असे लेखी उत्तर देण्यात आले. त्यामुळे चार्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याने स्टॉक रजिस्टरशिवाय विभागाचा कार्यभार कसा स्वीकारला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, नगरपालिकेने दि. १९ मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रात स्टॉक रजिस्टर उपलब्ध नसल्याचे म्हटले असले, तरी सध्याच्या घडीला ते भांडार विभागात सुरक्षित असल्याची माहिती पुढे आल्याने प्रशासनाच्या उत्तरांमध्येच विसंगती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रजिस्टरमध्ये काही अनियमित नोंदी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात लेखापरीक्षण विभागाने नगरपालिकेच्या तीन वर्षांच्या कामकाजाचे ऑडिट केले. त्या वेळी संबंधित स्टॉक रजिस्टर लेखापरीक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते का? तसेच मुख्य लेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात रजिस्टर गहाळ असल्याची नोंद केली आहे का? याबाबतही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे नळदुर्ग नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांसह विरोधी पक्षाकडून होत आहे. प्रशासन याबाबत नेमके काय स्पष्टीकरण देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top