शिवसेनेच्या डिएनटी राष्ट्रीय नेतेपदी संजय राठोड यांची नियुक्ती; राज्यभरासह देशातील विमुक्त-भटक्या समाजाची संघटनात्मक जबाबदारी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नियुक्तीपत्र
मुंबई/नळदुर्ग, दि. २९ जुन :
शिवसेना पक्षाने विमुक्त व भटक्या जमाती समाजामध्ये संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे मृद व जलसंधारण खात्याचे कॅबीनेट मंत्री ना.
संजय राठोड यांची 'विमुक्त व भटक्या जमाती राष्ट्रीय नेते' म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते ना.एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र दिले आहे.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा, समाजकार्यातील उल्लेखनीय योगदान आणि संघटनात्मक क्षमतेची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संजय राठोड यांच्याकडे पश्चिम विदर्भातील शिवसेना संघटन विस्ताराची जबाबदारी कायम ठेवत राज्य आणि देशभरातील विमुक्त व भटक्या जमाती समाजामध्ये शिवसेनेचे संघटन उभारणे, विस्तार करणे आणि अधिक सक्षम बनविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यासोबतच डीएनटी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे, समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणे हीदेखील त्यांची प्रमुख जबाबदारी राहणार आहे.
नियुक्तीपत्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर राज्यासह देशभरातील विमुक्त-भटक्या समाजामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पक्ष विस्तारासाठी सर्वांना सोबत घेत समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या नियुक्तीमुळे विमुक्त व भटक्या जमाती समाजातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून, समाजाच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे वाचा फोडण्यास बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसैनिक आणि डीएनटी समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.