परंड्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची
 धडक कारवाई : ५७ हजारांच्या अमली गोळ्यांसह एक जेरबंद ; नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यावर कारवाई; मोबाईलसह मुद्देमाल जप्त

धाराशिव, दि. १६ :

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या एका संशयितास अटक केली. या कारवाईत सुमारे ५७ हजार २०० रुपयांचा अमली पदार्थ व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गुप्त बातमीदारा मार्फत परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १५ जून रोजी सायंकाळी सापळा रचून पोलिसांनी संशयित शाहिद सादिक शेख (वय ३९, रा. परंडा) यास ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून Nitcor-10 (Nitrozepam) च्या १५ गोळ्या, Nizascen-10 (Nitrozepam) च्या १० गोळ्या आणि Anzilum 0.5 (Alprazolam) च्या ९३ गोळ्या असा प्रतिबंधित औषधसाठा आढळून आला. तसेच विक्रीसाठी वापरण्यात येणारा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या अमली गोळ्या व मोबाईलसह एकूण ५७,२०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध NDPS कायदा तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योति प्रियासिंह, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर तसेच त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

नशेच्या वाढत्या विळख्यातून युवकांना वाचविण्यासाठी ANTF कडून सुरू असलेल्या अशा कारवायांचे नागरिकांकडून स्वागत होत असून, जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
 
Top