जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत; मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
नळदुर्ग, दि. १५ :
येथील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून शिक्षणप्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग शहरातील गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि शैक्षणिक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत दरवर्षी मोठ्या संख्येने पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुंदर भालकाटे यांच्यासह खोडके , भंडारे , डोंगरे , धुमाळ , गायकवाड आदी उपस्थित होत्या. तसेच नेताजी महाबोले, अंबादास पवार, महेश घोडके, महेश वाघमारे, लक्ष्मण अंगुले, सलीम शेख यांच्यासह अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.