मुरुम येथील शिक्षकपुत्राचा राष्ट्रीय पातळीवरील गौरव; गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणेचा दीप ठरले डॉ. शिवाजीराव शिंदे


मुरूम, ता. उमरगा, दि. १४  : 

शहरातील स्मृतीशेष सिद्राम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त वीरशैव संत कक्कया समाज व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हरियाणा राज्यातील पानिपत येथे भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय विभागात प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून सेवा बजावलेले सेवानिवृत्त डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या सेवापूर्ती सत्कारासह गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता. १४) रोजी श्रीराम मंगल कार्यालयात करण्यात आले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा-लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले होते. सत्कारमूर्ती म्हणून डॉ. शिवाजीराव शिंदे यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, निवृत्त पोलीस अधिकारी राम कांबळे, वीरशैव संत कक्कया समाज धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तू कटकधोंड, ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, मनोहर शिंदे, शाखाधिकारी सचिता चव्हाण, मेजर विजयकुमार शिंदे,  रुपाली शिंदे, प्रतिक शिंदे, ऐश्वर्या शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमात प्रमोद कुलकर्णी, राम कांबळे, दत्तू कटकधोंड व प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी शासकीय सेवेत राहून प्रामाणिकपणे काम करत समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवाजी शिंदे, पत्नी रूपाली शिंदे व कुटुंबीय यांचा मानपत्र, शाल, बुके संपूर्ण आहेर देऊन सत्कार करण्यात आला. 

 अध्यक्षीय भाषणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या उक्तीप्रमाणे मुरूम शहरातील शिंदे गल्लीसारख्या छोट्या परिसरातून पुढे येऊन आई-वडिलांच्या संस्कार, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीचे पद भूषविले, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. स्वतः घडत असताना त्यांनी विद्यार्थ्यांनाही घडविण्याचे कार्य केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ते नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवावी, कोणत्याही व्यसनापासून दूर राहून शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करावे.

 कार्यक्रमसाठी  वसंत शिंदे, खंडू शिंदे, गिरजप्पा कावळे, धनराज शिंदे, ज्योतीराम शिंदे, प्रवीण शिंदे, श्रावण कटके, सचिन शिंदे, रेवण कटके, बाबू शिंदे, मधुकर शिंदे, जोतीराम रकमाजी शिंदे, राजेंद्र कटके, वैभव कटके, अमोल कटके, सुलोचना शिंदे, जयश्री कावळे, महादेवी शिंदे, रेशमा शिंदे, साक्षी शिंदे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर मोटे तर संतोष पवार यांनी सूत्रसंचालन तर गंगाधर शिंदे यांनी आभार मानले. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा प्रेरणादायी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. 


 
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top