कॉलेज रोड ते खंडोबा रोड परिसरात दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची चर्चा; नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
नळदुर्ग, दि. १४ :
नळदुर्ग शहरातील दोन वेगवेगळ्या विभागांतील दोन अधिकारी कर्तव्याच्या वेळेत वारंवार कॉलेज रोड ते खंडोबा रोड या परिसरातच दिसून येत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. या अधिकाऱ्यांची उपस्थिती अनेकदा याच भागात आढळत असल्याने नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शहरातील इतर भागांपेक्षा या विशिष्ट मार्गावर अधिक वेळ घालवत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या या वारंवार उपस्थितीमागील नेमके कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे.
शहरात याबाबत खमंग चर्चा सुरू असून, काही नागरिकांनी या परिस्थितीची तुलना लोकप्रिय हिंदी गाण्यातील "दो दिवाने शहर मे, रात या दोपहर मे..." या ओळींशी करत उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर वरील गीताचा उल्लेख करत नागरिकांमध्ये विनोदी आणि मिश्किल स्वरूपाच्या चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी वारंवार याच परिसरात का उपस्थित असतात, त्यांचे कामकाज नेमके काय असते आणि त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. काही नागरिकांनी याप्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
शहरातील विविध नागरिकांच्या समस्या आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या असताना संबंधित अधिकारी विशिष्ट भागातच अधिक वेळ घालवत असल्याचे दिसत असल्याने याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता वरिष्ठ प्रशासन या चर्चेची दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.