शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी श्री तुळजाभवानी मातेची कवड्यांच्या माळा कुंकू रवाना ; गडदेवता आई शिरकाई देवीला साडी-चोळी अर्पण करण्याचा मान तुळजापूरला


तुळजापूर ,दि.०२ जुन

 दुर्गराज रायगडावर अखिल भारतीय श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने युवराज श्री संभाजीराजे छत्रपती,सौ. संयोगिताराजे छत्रपती यांचे मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे महाराष्ट्र व देशभरातील तमाम स्वयंसेवक मावळे व शिवभक्त यांच्या परिश्रमातून उपस्थितीत  छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. यावर्षी ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथून आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले पवित्र हळदी कुंकू,१०८ अंबुकी कवड्यांच्या माळा,तसेच  गडदेवता शिरकाई देवीसाठी साडी-चोळी व ओटीचे साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी  ठेवून दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पाठविण्याची परंपरा आहे. मंगळवार दि. 2 जून रोजी हे साहित्य तुळजापूरचे नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य सतीश खोपडे यांचेकडे तुळजाभवानी मंदिर  गाभाऱ्यात सुपूर्द करण्यात आले.

 किल्ले रायगडावरील राजसदरेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी परिधान करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या १०८ अंबुकी  कवड्यांच्या माळांसह  श्री जगदीश्वर मंदिर, गडदेवता शिरकाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी,होळीच्या माळावरील  व अभिषिक्त शिवमूर्ती तसेच पालखी सोहळ्यातील महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र माळा पाठविण्यात आल्या आहेत. 
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील असे एकमेव राजे मानले जातात की ज्यांना आपल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेसोबत चांदीच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मान प्राप्त झाला. नवरात्रोत्सवात देवीच्या सिंहासनावर भवानी तलवारीसह महाराजांचा विशेष महाअलंकार मांडला जातो, ही परंपरा आजही जपली जात आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे, मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे, व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, समिती सदस्य सतीश खोपडे, गणेश पुजारी, महेश गवळी, श्रीकांत कदम, अनिल आगलावे, शिवशंकर म्हमाणे, गणेश भिंगारे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजापूरहून पाठविण्यात आलेले हे पवित्र साहित्य शिवछत्रपतींच्या कुलदेवतेशी असलेल्या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक नात्याची पुन्हा एकदा साक्ष देणारे ठरत आहे.
 
Top