नळदुर्ग येथे ‘आम्मा पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार’ २० जून रोजी
नळदुर्ग, दि. १९ :
शहरातील कै. यमुनाबाई रंगराव अहंकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कै. यमुनाबाई (आम्मा) रंगराव अहंकारी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त ‘आम्मा पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नळदुर्ग येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे तर प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून युनिटी मल्टिकाॅन्सचे मुख्य संचालक कपिल मोलवी, दिग्विजय दापके देशमुख, रामचंद्र रोचकरी, आर. एस. गायकवाड यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच पंचायत समिती सदस्य रणवीर चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सिद्धेश्वरजी कोरे यांच्यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘आम्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
कै. यमुनाबाई अहंकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.