"फुटाफुटीच्या युगात... ढग मात्र एकदिलाने!" 🌧️😄
पावसाची ओढ...! ☁️🌧️
"अरे आमदार फुटले, खासदार फुटले, राजकीय पक्ष फुटले, परीक्षेचे पेपर फुटले... पण रे बाबा, तुझे ढग आमच्यावर कधी फुटणार?"
सध्या राज्यात फुटण्याचा हंगामच सुरू आहे. कुठे पक्ष फुटतात, कुठे नेते फुटतात, कुठे आघाड्या फुटतात तर कुठे प्रश्नपत्रिका फुटतात. पण ज्याची खरी गरज आहे ते ढग मात्र "फुटण्याऐवजी" फक्त फिरत आहेत!
शेतकरी रोज आकाशाकडे पाहतो. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवायचा की देवाच्या भरवशावर राहायचं, हा त्याच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. मोबाईलवर "उद्या मुसळधार पाऊस" असा मेसेज येतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण हसतच उगवतात.
राजकारणात एका रात्रीत समीकरणे बदलतात, पण पावसाचे समीकरण मात्र काही केल्या जुळत नाही. ढग येतात, गडगडाट करतात, वीज चमकवतात, आशा दाखवतात आणि मग एखाद्या नेत्यासारखे आश्वासन देऊन निघून जातात.
गावातील शेतकरी मनोमन म्हणतो,
"अरे ढगा, तुला पक्षांप्रमाणे फुटायचे असेल तर फुट, पेपरांप्रमाणे फुटायचे असेल तर फुट, पण आता तरी आमच्या शिवारावर फुट! कारण तुझ्या एका सरीची किंमत हजार भाषणांपेक्षा जास्त आहे."
आता जनतेची एकच मागणी आहे— "राजकीय घडामोडी थांबल्या तरी चालतील, पण पावसाच्या घडामोडी सुरू होऊ द्या!"
काव्यांजली