पंढरपूर विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक लेपनास वारकरी संघटनांचा विरोध
मूर्तीला हानी झाल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
पंढरपूर, दि. १७ :
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ व २४ जून रोजी प्रस्तावित रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला वारकरी संप्रदाय व महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. मूर्तीवर रासायनिक लेपन केल्यास तिच्या नैसर्गिक संरचनेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा संघटनांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले की, कोरोना काळात करण्यात आलेल्या लेपनानंतर पुन्हा काही वर्षांतच लेपनाची गरज भासणे ही प्रक्रिया अपयशी ठरल्याचे दर्शविते. संत-महंत व तज्ज्ञांना विश्वासात न घेता ही प्रक्रिया राबविल्यास राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मूर्तीला कोणतीही हानी झाल्यास मंदिर समिती व पुरातत्त्व विभागाविरोधात न्यायालयीन लढा तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा वारकरी संघटनांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व मंदिर समितीकडे सादर करण्यात आले आहे.
यावेळी ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, प्रसाद पंडित, चंद्रकांत रमणशेट्टी, विनोद रसाळ व राजन बुणगे उपस्थित होते.