लोहाऱ्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १२ जण जेरबंद, ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोहारा, दि.१७ :
धाराशिव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला वेग देत पोलिसांनी लोहारा शहरातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ९ लाख ३८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रीतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लोहारा येथील काणेगाव रोड तसेच माकणी चौक परिसरातील शंभूराजे हार्डवेअर येथे सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले.
या धाडीत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच क्यूआरटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान १३ संशयित आढळून आले. त्यापैकी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक संशयित फरार झाला आहे.
संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू, अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची तस्करी व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम उघडली असून अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. लोहाऱ्यातील या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.