नळदुर्ग अपर तहसिल कार्यालयात निवेदन देताना श्रीकांत पोतदार 

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १९ जून रोजी ट्रॅक्टर-मोटारसायकल रॅली; विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

नळदुर्ग, दि. १७ : 

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार, दि. १९ जून २०२६ रोजी भव्य ट्रॅक्टर व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन ही रॅली नळदुर्ग अक्कलकोट रोडवरील गणेश मंदिर ते अपर तहसील कार्यालय पर्यंत 
निघणार असल्याची माहिती दिलीप जोशी यांनी सांगितले.


यासंदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले असून आंदोलनाची पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली आहे.
समितीचे समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी व शर्थी शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा रकमेबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धान्य वाटप योजनेंतर्गत थकीत रक्कम उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना नियमित धान्यपुरवठा सुरू ठेवण्याची मागणीही  करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, गळीत हंगामातील उसाची थकीत बिले शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावीत तसेच शालेय व उच्च शिक्षणासाठी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
निवेदनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ वरील नळदुर्ग-अक्कलकोट मार्गावरील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या कथित पोलिस बळाच्या वापराबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांसाठी दि. १९ जून रोजी सकाळी १० वाजता ट्रॅक्टर व मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.


 
Top