संकटाच्या क्षणी एकच नंबर... 'डायल 112'; धाराशिवकरांना पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे आवाहन

धाराशिव, दि. २२ जुलै :

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळ न दवडता 'डायल 112' या एकात्मिक आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी केले आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'डायल 112' ही सेवा चोवीस तास कार्यरत असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे. गुन्हेगारी घटना, रस्ते अपघात, महिला व बालकांवरील अत्याचार, संशयास्पद हालचाली, घरगुती हिंसाचार, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित घटना, वैद्यकीय आणीबाणी तसेच अग्नितांडव अथवा आग लागल्याच्या घटनांमध्ये नागरिकांनी तत्काळ 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन मदतीसाठी वेळेवर माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत व कायदेशीर कारवाई करणे शक्य होते. त्यामुळे कोणतीही गंभीर घटना न लपवता अथवा विलंब न करता 'डायल 112' या सेवेला माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या सेवेबाबत जागरूक राहून स्वतःच्या तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी 'डायल 112'चा प्रभावी वापर करावा, असेही आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top