कोट्यवधींचे उपजिल्हा रुग्णालय; उपचाराऐवजी ‘रेफर’चाच फॉर्म्युला!; डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने आरोग्यसेवेवर परिणाम?; रक्तपेढी, ट्रॉमा सेंटरची प्रतीक्षा कायम, नागरिक संतप्त
नळदुर्ग, दि. २२ जुलै :
गोरगरीब रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने शासनाने नळदुर्ग येथे कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले. भव्य इमारत, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपी यंत्रणा, सोनोग्राफी, ईसीजी, महा लॅब, दंत, नेत्र, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग व फिजिशियन तज्ज्ञांसह सर्व सुविधा कागदावर उपलब्ध असल्या, तरी प्रत्यक्षात बहुतांश रुग्णांना उपचाराऐवजी थेट सोलापूरसह अन्य शहरांकडे ‘रेफर’ करण्याचीच पद्धत राबविली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
रुग्णालयासाठी उभारण्यात आलेली डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आजही ओस पडलेली आहेत. येथिल वैद्यकीय अधिक्षकाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असुन बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसून, बाहेरगावी राहून रोज ये-जा करत असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही अधिकारी वारंवार गैरहजर राहत असून, रुग्णालय हंगामी डॉक्टरांवरच चालत असल्याचे चित्र दिसून येते.
नळदुर्ग शहरातून दोन महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने अपघात व आपत्कालीन रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने तातडीच्या उपचारात अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे गंभीर रुग्णांनाही त्वरित सेवा मिळत नसून, त्यांना इतर शहरांकडे हलविण्याची वेळ येते.
रुग्णालयात सिझेरियन प्रसूती, अपेंडिक्ससह विविध शस्त्रक्रियांची सुविधा असूनही किरकोळ कारणांसाठीही रुग्णांना रेफर केले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अतिरिक्त खर्च, प्रवासाचा त्रास आणि उपचारातील विलंब सहन करावा लागत आहे. परिणामी, सरकारी आरोग्यसेवेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असून, खासगी रुग्णालयांकडे वळण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
२४ तास कंत्राटी कर्मचारी उपलब्ध असतानाही कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती वारंवार जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांची वेळेवर तपासणी होत नसल्याचे, समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे तसेच काही वैद्यकीय अधिकारी रुग्णांना भेटण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही आरोप पुढे येत आहेत. मनमानी कारभारामुळे अनेक कंत्राटी डॉक्टरांनी नोकरी सोडल्याची चर्चा देखील रंगत आहे.
दरम्यान, एवढी मोठी जागा आणि सुविधा उपलब्ध असतानाही रक्तपेढी (ब्लड बँक) व ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. या अत्यावश्यक सुविधा तातडीने कार्यान्वित करून उपलब्ध यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जबाबदारीने सेवा द्यावी आणि अनावश्यक रेफरचे प्रमाण कमी करावे, अशी जोरदार मागणी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांतून होत आहे.
नळदुर्ग रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराप्रकरणी धाराशिव जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य कर्मचा-यांच्या निवासस्थानात वीज जोडणी नाही, त्याचबरोबर कामचुकार करणा-यावर नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.