लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्गात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सामाजिक उपक्रम
नळदुर्ग, दि. २२ जुलै (अझहर शेख) :
दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले.
श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा व जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी नगरसेवक व श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष संजय बताले, नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. आर. जुनैदी , रमेश पिसके, निलय्या स्वामी, बबलू इनामदार, सुनील बताले, वसीम काझी, युवराज साखरे राहुल बताले यांची उपस्थिती होती.
प्रतिमा पूजनानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना वाहिलेल्या आदरांजलीमुळे कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.