शालेय व्यवस्थापन समितीच्या इशाऱ्याने प्रशासनाची झोप उडणार?
'शिक्षक द्या, अन्यथा ३१ जुलैला शाळेला कुलूप' ; नळदुर्गमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
नळदुर्ग, दि. २२ जुलै :
ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत प्राथमिक पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अन्यथा ३१ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन व विकास समितीने दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका तथा शाळा विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सदस्या श्रीमती जुलेखाबेगम मैनोद्दीन इनामदार यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दोन प्राथमिक पदवीधर शिक्षक व एक परिचर पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या १८ जुलै २०२६ च्या ठरावाचा संदर्भ देत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषद प्रशाला, नळदुर्ग येथे मागील वर्षापासून दोन प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे मंजूर असूनही अद्याप एकही शिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.
सध्या मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावी ते आठवीमध्ये ५९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत एकही पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे. समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समितीने प्रशासनाला ३१ जुलैपर्यंत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती आणि तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण विभाग या मागणीवर कितपत तातडीने निर्णय घेतो, याकडे पालकांसह परिसराचे लक्ष लागले आहे.