नळदुर्गकरांचा सवाल : "नगरपालिकेचा पगार की अल्लाउद्दीनचा चिराग?"
दि.२२ जुलै:
नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत व्यापारी बनलेला 'मुख्याधिकारी लफडेकर' यांचा कथित मालमत्तेचा किस्सा सध्या शहरात चहाच्या टपरीपासून चौकापर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापूर शहरात तब्बल १६ एकर रहिवासी बिनशेती जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येताच, नळदुर्गकरांच्या भुवया उंचावल्या असून, "हे नेमकं सरकारी वेतनाचं गणित आहे की जादूचा दिवा?" असा मिश्किल सवाल विचारला जात आहे.
ज्यांना महिनाअखेर पगार संपल्याची चिंता असते, त्यांच्यासाठी एवढी कोट्यवधींची मालमत्ता म्हणजे एखाद्या चित्रपटातील कथानकच वाटावे! त्यामुळे "नगरपालिकेत नोकरी करायची की खजिन्याचा नकाशा शोधायचा?" अशा टोमण्यांनी चर्चा रंगू लागली आहे.
या कथित बेहिशेबी मालमत्तेच्या चर्चेमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाल्याचे बोलले जात असून, नळदुर्गकर मात्र एका प्रश्नावर ठाम आहेत "जर सर्व काही नियमात असेल, तर पारदर्शक चौकशीला घाबरण्याचे कारण काय?"