गुप्त माहिती ठरली अचूक; अवैध गुटखा वाहतुकीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
धाराशिव शहर पोलिसांची धडक कारवाई; 25.36 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओ जप्त

धाराशिव, दि. 14 (प्रतिनिधी) : धाराशिव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 25 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल, त्यात प्रतिबंधित गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांना 12 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत एमएच-25-बीएफ-3696 क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून प्रतिबंधित गोवा गुटख्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रात्री 11.45 वाजता सापळा रचून वाहनाची तपासणी केली.

तपासणीत स्कॉर्पिओमधून 'गोवा गुटखा डायरेक्टर पान मसाला'च्या 40 गोण्या (1,800 पॅकेट) तसेच 'SHOT Luxury Chewing Tobacco'च्या 40 गोण्या (1,800 पॅकेट) असा एकूण 10 लाख 36 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल आढळून आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 25 लाख 36 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी गणेश मारुतीराव धुमाळ (रा. बार्शी), रोहन रविंद्र कदम, जाफर जमादार (रा. आळणी, कर्नाटक), अमोल गुंजाळ आणि पवन जीवन पौळ (रा. आळणी, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 319/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 123, 274, 275, 223 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दराडे तसेच पोलीस अंमलदार माळी व जाधवर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
 
Top