श्री तुळजाभवानीच्या चरणी तेलंगणा विधानसभा उपाध्यक्ष; बंजारा समाजाकडून जंगी सत्कार

बंजारा समाजाकडून उत्स्फूर्त सत्कार; आरक्षणासह सर्वांगीण विकासाची केली जोरदार मागणी

तुळजापूर ,दि.१४:

तेलंगणा राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष जाटोत रामचंद्र नायक यांनी सपत्नीक महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी तुळजापूर येथे गोर बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.

तुळजापूर शहरात आगमन होताच धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, गोर बंजारा एकता विचार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल चव्हाण, अविनाश चव्हाण यांच्यासह समाजबांधवांनी त्यांचे स्वागत केले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनेही मंदिर परिसरात त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जाटोत रामचंद्र नायक यांनी देशातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त केले. शिक्षण, संस्कृतीचे जतन, रोजगारनिर्मिती आणि मूलभूत सुविधांचा विस्तार यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरक्षण हा बंजारा समाजाचा हक्क
देशभरातील बंजारा समाजाची भाषा, संस्कृती आणि परंपरा जपली गेली पाहिजे. समाजाला घटनात्मक हक्कांनुसार आरक्षणाचा लाभ मिळणे ही काळाची गरज असून, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

मंदिर प्रशासनाच्या सुविधांचे कौतुक
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा, स्वच्छता आणि सुयोग्य नियोजनाबद्दल त्यांनी मंदिर प्रशासनाचे विशेष कौतुक केले. भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात येणारे उपक्रम समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.



 
Top